मुंबई : प्रतिनिधी
चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. रविवारी न्यूझीलंडविरूद्ध खेळताना भारताने ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवला. फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने डॅरेल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (७६), श्रेयस अय्यर (४८) आणि केएल राहुल (नाबाद ३४) या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर सर्व स्तरातून टीम इंडियाचे अभिनंदन होत आहे. त्यातच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच चार खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्याबद्दल विशेष अभिनंदन. विशेष यासाठी कारण चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडियाला अनेक वेळा हुलकावणी देत होती. अखेर २०२५ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. लागोपाठ आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला.
चार खेळाडूंचे केले विशेष कौतुक
स्पर्धेच्या सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मबाबत अनेक टीका करण्यात आल्या होत्या, पण दोघांनीही या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि अनुभव पणाला लावून ‘क्लासी बॅटिंग’ करत संघाला स्पर्धा जिंकून दिली. वरूण चक्रवर्ती याचेही विशेष कौतुक आहे. आधी क्रिकेट खेळल्यानंतर तो आर्किटेक्ट झाला, त्याने नोकरी केली पण पुन्हा तो क्रिकेटकडे वळला आणि या स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कुलदीप यादवनेही आपल्या फिरकीने कमाल करून दाखवली आणि न्यूझीलंडला अडचणीत आणले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाच्या चार खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
सर्व खेळाडूंना देणार प्रशस्तीपत्रक
युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताने दमदार कामगिरी केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला. सध्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. मी अनेक जणांकडून असे ऐकले की भारताने सध्या अ आणि ब असे दोन संघ बनवले तरीही तेच दोन संघ फायनल मध्ये खेळतील इतके भारतीय क्रिकेट बहरलेले आहे. या चॅम्पियन संघातील खेळाडूंचे मी सभागृहाच्या वतीन मनापासून अभिनंदन करतो, असेही फडणवीस म्हणाले. तसेच, हा अभिनंदनाचा ठराव प्रशस्तीपत्रकाच्या रूपाने चॅम्पियन संघाती प्रत्येक खेळाडूला पाठवावा, अशी विनंतीही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली.