मुंबई : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यामध्ये २१०० रुपये मिळणार नाहीत. एप्रिल महिन्यामध्ये १५०० रुपयेच मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू. घोषित करू. आम्ही लपवून थोडी घोषित करणार आहोत? आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये आणि त्या महिन्यापासून देऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिल्या जाणा-या आर्थिक मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून २१०० रुपये कधी वाढणार याची चर्चा होती. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली जाईल, असे राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात आले. पण, अजित पवारांनी याबद्दल घोषणा केली नाही. त्यामुळे २१०० रुपये नक्की कधीपासून मिळणार? या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विचारण्यात आले. फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्पात २१०० रुपयांबद्दल घोषणा करण्यात येईल, असे सांगितले होते. पण, तशी घोषणा झाली नाही. १५०० रुपयेच मिळणार, हे अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झाले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून मिळणार?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आणि २१०० रुपये कधीपासून मिळणार, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलीही योजना तयार होते, तेव्हा गृहीत एक असतं की, साडेतीन कोटी, तीन कोटी आणि साधारणत: ते २ कोटी ७० लाख झाले, तर तेवढे पैसे वाचतात. आपल्याला योजनेसाठी पैसे किती लागणार आहे, ते वर्षभराने समजते. मागच्या वर्षीच्या अंदाजाच्या आधारावर आम्ही पैसे ठेवलेले आहेत. उद्या योजनेचे पैसे वाढवायची गरज पडली, तर वाढवता येतात. कुठलीही अडचण नाहीये. आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवायचे आहे : फडणवीस
२१०० रुपये कधीपासून देणार? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, असे आहे की, त्यासंदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. बघा शेवटी अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आहे. आता ट्रेण्ड आमच्याकडे चांगले आहेत. राष्ट्रीय स्तरावर ७ टक्क्यांवर आहे. पण, त्याचवेळी जर आपल्याला शाश्वत पद्धतीने आपल्या योजना चालवायच्या असतील, तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. तीन टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. आता मागच्या वर्षी २.९ टक्के झाले. म्हणून आता २.७ पर्यंत आपण आणलेले आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.