मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
२०२३ मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आता लोकांना कळेल हू इज धंगेकर? अशी मिश्किल टिप्पणी केली. शिंदे यांच्या या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
हू इज धंगेकर? : एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली आणि लोकसेवक काय असतो हे दाखवले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात, त्यामुळे लोकांना कळेल हू इज धंगेकर?
पक्ष सोडताना मला दु:ख : धंगेकर
आज सकाळी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सोडणार असल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले. मी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, त्यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला दु:ख होत आहे.