छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
‘दख्खनचा ताज’ अशी ओळख असणा-या ‘बीबी का मकबरा’ची दुरवस्था वाढत चालली आहे. वर्षात लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या वास्तूमधील नक्षीदार कठड्यांना चक्क बांबूचा आधार द्यावा लागला आहे. या घटनेमुळे पुरातत्व विभाग काय करतोय? असा प्रश्न इतिहास अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही वर्षांमध्ये ‘बीबी का मकबरा’च्या चारही बाजूला असलेले मनोरे काळवंडले आहेत. तर काही ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही ठिकाणी तातडीने दुरुस्ती गरजेची झाली आहे.
आग्रा येथील ताजमहालचा जगातील आश्चर्यांमध्ये समावेश केला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून या ऐतिहासिक वास्तूकडे पाहिले जाते. अशीच वास्तू छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. ताजमहाल हा पूर्णत: संगमरवरी दगडात बांधण्यात आला आहे. त्याचे काम १६४८ मध्ये पूर्ण झाले. त्याच्या काही वर्षांतच म्हणजे १६५१ मध्ये बेगमपुराजवळ औरंगजेबाने मकबरा बांधण्याचे काम सुरू केले.
जवळपास १६६० मध्ये ते काम पूर्ण झाले. त्यावेळचा राजा औरंगजेब याने आपली पत्नी राबिया दुर्राणीसाठी ही वास्तू बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र, १६७६ मध्ये औरंगजेबाचा मुलगा आझमशाह यानं त्याची दुरुस्ती केली. तसे पुरावे असल्याने त्यानेच आईसाठी ही वास्तू उभी केल्याची माहिती पसरवण्यात आली. मुळात हा मकबरा औरंगजेबाने बांधल्याची माहिती अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी दिली.
कठड्यांना बांबूचा आधार
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच जगाला आकर्षित करणारी वास्तू डोळ्यासमोर उभी राहते. ओट्यावरून खाली उतरवून मुख्य वास्तूकडे जाताना मध्यभागी पाण्याचे कारंजे असून दोन्ही बाजूने वाट निघते. रस्त्याच्या कडेला पांढ-या सिमेंटमध्ये त्याकाळी तयार केलेली नक्षीदार जाळी असलेली संरक्षण भिंत म्हणजेच कठडे लक्ष वेधून घेतात. मात्र, हेच कठडे कोसळण्याच्या अवस्थेत आले आहेत. त्यांना बांबूंचा आधार देऊन उभे करण्याची वेळ आली आहे.