वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या शेअर बाजारात महाराष्ट्राच्या पूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त पैसा फक्त एका दिवसात बुडाल्याचे समोर आले आहे. अमेरिकन शेअर बाजारातील फक्त ७ कंपन्यांचे हे नुकसान आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या नुकसानीचा आकडा महाराष्ट्राच्या बजेटच्या दीडपट मोठा आहे. त्यामुळे शेअर बाजारातील पडझडीत अवघ्या ७ कंपन्यांचे किती मोठे नुकसान झाले, याचा अंदाज येतो.
गेल्या काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ धोरण आणि आंतरराष्ट्रीय भूमिका यामुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात यामुळे प्रचंड चढ-उतार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अमेरिकन शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड झाली. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील ७ मोठ्या कंपन्यांचे मिळून सोमवारी १० मार्च रोजी एका दिवसात तब्बल ७५० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळपास ५०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. पण सोमवारी म्हणजे अवघ्या एक दिवसात अमेरिकन अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या तब्बल दीडपट म्हणजेच ७५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. त्यात एकट्या अॅपलचे १७४ अब्ज डॉलर्स बुडाले. त्यापाठोपाठ एआय चिपमेकर कंपनी असलेल्या एनविडियाचे १४० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. ५ टक्क्यांनी एनविडियाचे शेअर्स खाली आले. यासोबतच टेस्लाच्या बाजारमूल्यात १५ टक्के घट झाली. गुगल आणि मायक्रोसॉफ्टचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
७ कंपन्यांचे ७५० अब्ज डॉलर्सचे नुकसान!
अॅपल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, एनविडिया, गुगल-अल्फाबेट, अॅमेझॉन आणि मेटा या अमेरिकेतील ७ बलाढ्य अशा तंत्रज्ञान कंपन्या आहेत. बाजारपेठेवरची पकड, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांवर प्रभाव या बाबतीत या ७ कंपन्या अतिप्रचंड अशा मानल्या जात आहेत. या ७ कंपन्यांचे सोमवारी ७५० अब्ज डॉलर्सहून जास्त नुकसान झाले. नॅसडॅकला तर २०२२ पासून गेल्या तीन वर्षांतील ही सर्वात मोठी पडझड आहे.