30 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रखोक्या भोसलेला अटक; उत्तर प्रदेशातून पोलिसांनी घेतले ताब्यात

खोक्या भोसलेला अटक; उत्तर प्रदेशातून पोलिसांनी घेतले ताब्यात

बीड : प्रतिनिधी
भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. यासंदर्भात माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

खोक्याच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचे शेवटचे लोकेशन सापडले. त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुस-या राज्यात अटक केल्याने ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागते. त्याकरता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथे आणण्यात येणार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी वाल्मिक कराड, त्याचे साथीदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध रान उठविणारे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याने लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण
राज्यात खळबळ उडाली.

त्यानंतर खोक्या भोसलेचा दुसरा व्हीडीओही व्हायरल झाला. यामध्ये तो पैशांचं बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात-गळ्यात सोन्याचे दागिने घालून मिरवणे असे दृश्य दिसत होते. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले. त्यामुळे खोक्या भोसलेवर आतापर्यंत वन विभागात आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

प्रकरणाची पूर्ण चौकशी आवश्यक
अंजली दमानिया
हा प्रयागराजला पोहोचला कधी? कारण परवा रात्री याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. मग प्रयागराजला पोहोचल्यानंतर बीडच्या पोलिसांना माहिती मिळाली आणि मग त्यांनी अटक केली. बीडच्या पोलिसांना आतापर्यंत कधी कारवाई करताना पाहिले नव्हते. पहिली मोठी कारवाई बीडच्या पोलिसांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यापुढे त्याची संपूर्ण चौकशी करावी. त्याच्या एका लॉकरमध्ये प्रचंड प्रमाणात सोनं असल्याचीही माहिती आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

कायद्याप्रमाणे कारवाई होईल : सुरेश धस
खोक्याला अटक झाली ही चांगली बाब आहे. त्याने चूक केली. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. खोक्यावर जी काही कलमे लागली आहेत. त्याप्रमाणे कारवाई पोलिस करतील,’’ अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

खोक्यामागचा बोक्या शोधा- वडेट्टीवार
खोक्या भेटला हे चांगलेच झाले. पण, त्याच्यामागचे बोके कोण हे शोधले पाहिजे. इकडे आकाचा आका शोधला. तसा खोक्याचा बोका शोधा. त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले. सोन्याचा खजाना कुठून येतो, हे शोधले पाहिजे,’’ अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR