बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून केला आहे. या हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. तीन महिन्यांपासून बीड पोलिसांसह सीआयडीला गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता कृष्णा आंधळेच्या लोकेशनबाबत सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा सर्वांत मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलिस परिसरात दाखल झाले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका मोटारसायकलवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. दत्त मंदिराकडे जात असताना एका बाजूला दोघे उभे होते. त्यापैकी एकाने मास्क खाली घेताच तो कृष्णा आंधळे असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी तात्काळ पोलिसांना फोन केल्याचे त्याने म्हटले आहे. या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत शोध सुरू केला आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार झाला आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले मात्र कृष्णा आंधळेने सर्वांनाच गुंगारा दिला आहे. तब्बल तीन महिने कृष्णा आंधळे न सापडल्याने त्याची हत्या झाली असावी, असाही दावा अनेकांनी केला होता. मात्र अशातच आता पहिल्यांदाच कृष्णाला पाहिले गेल्याचा दावा केल्याने तपासाला गती येण्याची शक्यता आहे.