28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रअनिल परब-प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी

अनिल परब-प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी

पीएफचे पैसे महामंडळाने वापरल्याचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
एसटी कर्मचारी व अधिका-यांच्या भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करणे बाकी असल्याची बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (१२ मार्च) विधान परिषदेत मान्य केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार शशिकांत शिंदे यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मुद्यावरून मंत्री सरनाईकांना घेरले. त्यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले, पीएफ व ग्रॅच्युइटीची २,२१४.४७ कोटी रुपये इतकी रक्कम अदा करणे बाकी आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही ती अदा करू.

सरनाईक म्हणाले, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचा-यांना पगारवाढ दिली आहे. दुस-या बाजूला भविष्य निर्वाह निधीसंदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचा-यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही. यावर अनिल परब म्हणाले, कर्मचा-यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचा-यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. तसेच कर्मचा-यांचे पैसे तात्काळ जमा करा.

यावर प्रताप सरनाईक म्हणाले, महामंडळाची ६४ कोटी रुपयांची मासिक तूट आहे. तसेच शासनाकडून आम्हाला ५८२ कोटी रुपये येणे बाकी आहे. मानव विकास योजनेचे २६८ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, मी सर्वांना आश्वस्त करतो की कर्मचा-यांच्या पीएफवरील व्याजाच्या रकमेचे नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही. एकाही कर्मचा-याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही.’’

कर्मचा-यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय, या लोकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच या कटात मंत्री सरनाईक सहआरोपी आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. यावर मंत्री म्हणाले, एसटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा कुठल्याही प्रकारचा एकही रुपया इतरत्र खर्च केला जाणार नाही. काही स्थितीत किंवा वेगळ्या वातावरणानुसार, राज्य शासनाच्या निधीअभावी काही गोष्टी घडत असतात. मात्र आम्हाला कोणत्याही कर्मचा-याच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR