28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील : अदिती तटकरे

मुंबई : प्रतिनिधी
अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यात आज (बुधवारी) महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. ‘महायुती सरकारने शेतक-यांची कर्जमाफी केली नाही, शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे… शेतक-यांच्या मागण्या मान्य करा… कंत्राटदार तुपाशी… शेतकरी उपाशी…’, अशा घोषणा देत विरोधकांनी आंदोलन केले. यानंतर विधानसभेतही विरोधकांनी सभात्याग केला.

गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. तसेच, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात देखील असे म्हटले होते. परंतु आता राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले, तरी लाडक्या बहिणींना अद्याप २१०० रुपये देण्यात आले नाहीत. त्यामुळे ही केवळ घोषणा निवडणुकीसाठी होती का? असा संशय लोकांना येत आहे, असा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला. तर लाडक्या बहिणीला २१०० रुपये देऊ म्हटले होते ते कधी देणार? कधीपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार? असा प्रश्न आमदार वरुण सरदेसाई यांना विचारला.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी लाडक्या बहिणीबाबत प्रश्न विचारल्यानंतर याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही आश्वासन नक्की दिलं होतं आणि त्याबाबत २१०० रुपये कधी द्यायचे? त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री हे विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले.

परंतु या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? हे आधी सांगा, अशी विरोधकांनी भूमिका घेतली. यावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालत, सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे… केवळ मतांसाठी ही योजना आणली होती, असा आरोप विरोधकांनी केला. तसेच, ‘लाडक्या बहिणींना फसवणा-या सरकारचा धिक्कार असो…’, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR