सोलापूर : पुणे विभागीय उपनिबंधकांनी जिल्हा दूध संघावर प्रशासक नियुक्ती केली. त्यानंतर संचालक मंडळाने मुंबई येथील सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे अपील केले आहे. त्याची सुनावणी १७ मार्चला होणार आहे.
संचालक मंडळाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघ तोट्यात गेल्याने पुणे येथील विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दूध संघावर प्रशासक म्हणून श्रीनिवास पांढरे यांनी नियुक्ती केली होती. पांढरे हे पदभार घेण्याच्या अगोदरच संचालक मंडळाने सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील केले आहे.
अपिलानंतर सहनिबंधक सहकारी संस्थेने विभागीय उपनिबंधक पुणे, सहायक निबंधक सहकारी संस्था सोलापूर, प्रशासक श्रीनिवास पांढरे, सहाय्यक निबंधक वैशाली साळवे, सहकार अधिकारी व्ही. जे. वडतिले, तक्रारदार तथा संचालक संभाजी मोरे यांना पत्र पाठवून १७ मार्चला सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा दूध संघावर प्रशासक असताना दूध संकलन मोठ्या प्रमाणात होते. संचालक मंडळ आल्यानंतर दूध संकलन तीन हजार लिटरवर आले आहे. दूध संघ तोट्यात असताना सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील करण्याची काय गरज आहे. दूध संघाची जागा कमी दरात विक्री करण्याचा डाव संचालक मंडळांचा आहे.असे जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल आवताडे यांनी सांगीतले.