मुंबई : प्रतिनिधी
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून आता शरद पवार यांच्या गटात दोन मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे. पवारांच्या एका खासदाराने औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा केली आहे. तर आमदाराने औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन केले आहे. त्यामुळे शरद पवार गट या मुद्द्यावरून संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांची हत्या केली. त्यामुळे औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर खोदून काढावी, अशी मागणी होत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर ही मागणी लावून धरली आहे. या मागणीला विरोधकांकडूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. पण या मागणीवरून शरद पवार यांच्या गटातच फूट पडल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे. तर आमदार अभिजीत पाटील यांनी औरंगेजबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. त्यामुळे पवार गटातच औरंगजेबावरून बेबनाव असल्याचें स्पष्ट झाले आहे.
माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवराय आणि छात्रवीर संभाजी महाराजांच्या शौर्य तसेच पराक्रमाचे, गौरवाचे प्रतिक आहे. हा शौर्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळायला हवा, असं म्हणत अभिजीत पाटील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील मुख्य विषय आणि जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपचे नेते, मंत्री नितेश राणे यांच्यावर केली आहे.
औरंगजेब काही महापुरुष नव्हता : लंके
खासदार निलेश लंके यांनी चार दिवसापूर्वी मीडियाशी संवाद साधला होता. औरंगजेब काही महापुरुष नव्हता की राष्ट्रपुरुष नव्हता. तो काही समाजसेवकही नव्हता. त्यामुळे या विषयाला सामाजिक रुप देण्याचं कारण नाही. त्याची कबर हटविण्यात काही गैर नाही. औरंगजेबाची कबर काढून टाकलीच पाहिजे, असं निलेश लंके म्हणाले होते. कबरीबाबत सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोपही लंके यांनी केला होता.
तरच अत्याचाराच्या घटना थांबतील : अभिजीत पाटील
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यावरही अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गैरवर्तन करून स्त्रीया, मुलींचा अवमान करणा-या नराधमांना भर चौकात फाशी द्यायला हवी तरच ही वृत्ती बंद होईल. स्वराज्यातील छत्रपती शिवरायांच्या न्यायव्यवस्थेसारखी कठोर पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचलावीत. तरच या अत्याचाराच्या घटना थांबतील, असे अभिजीत पाटील यांनी म्हटले आहे.