बीड : प्रतिनिधी
बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर निशाणा साधलाय. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे तेथील परिस्थिती तशी झालीय. आधी बीड जिल्हा असा नव्हता, असं म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडलीय. धर्मांवरून तेढ निर्माण करण्याचे कामे केली जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलाय.
शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. गोविंद बागेतील निवासस्थानी नागरिकांची भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड आणि राज्यातील परिस्थितीवरून त्यांनी सरकारला खडेबोल सुनावलेत.
बीड जिल्हा असा कधीच नव्हता. सर्व राजकारण्यांसोबत घेऊन धरून चालणारा जिल्हा होता. परंतु जिल्ह्यातील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तेथे अशी परिस्थिती निर्माण झालीय. राज्य सरकारने याकडे दिलं पाहिजे, फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. कायदा हातात घेणारा जो कोणी असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बीडमध्ये पुर्वीचे दिवस, कसे येतील ते पाहवं, असं शरद पवार म्हणालेत.
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. एआयवर आधारीत ऊस उत्पादन घेतलेल्या शेतक-यांशी ते संवाद साधतील. दरम्यान त्याआधी शरद पवारांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. पत्रकार परिषदेला सुरुवात करताना त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. या पत्रात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. पंतप्रधान मोदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आले होते. त्याबद्दल शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडलाय. ही मागणीही त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीय. तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्यासाठी केंद्रसरकारला निर्देश देण्याचं सांगावं, अशी मागणीही शरद पवार यांनी मोदींकडे केलीय.