31.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रवांगी, पत्ताकोबी, फूलकोबी, टोमॅटोचे दर मातीमोल

वांगी, पत्ताकोबी, फूलकोबी, टोमॅटोचे दर मातीमोल

भंडारा : प्रतिनिधी
आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. फूलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटो, वांगी १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. पालक, कांदापात यासह इतर काही पालेभाज्यांचेही भाव पडले आहेत. भाजीपाला लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. खर्च भागवायचा तरी कसा, असा प्रश्न विचारीत संताप व्यक्त करीत आहेत.

रबी हंगामाची काढणी झाल्यानंतर उपलब्ध पाण्यावर अनेक शेतक-यांनी भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे भंडारा शहरातील बाजारात भाज्यांची, भाजीपाल्याची आवक वाढली आहे.
गत २० दिवसांपासून शहरात लसूण व अद्रक ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्यातच पांढरा व लाल कांदाही १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

ठोक बाजारात किरकोळ बाजारापेक्षा ५० टक्के कमी दराने कोबी, वांगी, टोमॅटोची विक्री होत आहे. यामुळे शेतक-यांना भाजीपाल्याची काढणी करून विक्री करण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

यंदा जिल्ह्यात बहुतांश शेतक-यांनी भाजीपाल्याची शेती केली आहे. यामुळे बाजारात आवक वाढली आहे. भंडारा शहरात रविवारी भरणा-या आठवडी बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक अधिक होती. सर्वत्र पालेभाज्या व फळभाज्यांचे ढीग दिसून आले.
महिनाभराने दर वाढण्याचा व्यापा-यांचा अंदाज

सध्या अपवाद वगळता सर्वच भाजीपाला १० ते ३० रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर दुपटीने चढण्याची शक्यता आहे.

टोपलीभर वांगी व टोमॅटो १० रुपयांत
गत महिनाभरापासून टोमॅटो व वांग्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत असल्याने रविवारी टोपलीभर वांगी व टोमॅटो १० रुपयांत विकले गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR