मुुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात शेतमालाला भाव नाही, आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, आया-बहिणी सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या मदतीला धावून आलाय औरंग्या… औरंग्याच्या कबरीने अचानक डोकं वर काढलंय… आता या कबरीचं करायचं काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे. उगाच इतिहासातील कुठल्यातरी दाखल्यांवरून एकमेकांची डोकी फोडत हे राज्य अशांत करू नका, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले आहे.
अमोल कोल्हे यांनी व्हीडीओ शेअर करत म्हटले आहे, की गेले काही दिवस महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते राजकीय विधानं करत आहेत. त्यात आज तेलंगणाच्या भाजप आमदारांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आणि वाद आणखी चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे, की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन केले जाऊ नये, ते सहन केले जाणार नाही, हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे, आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.