बीड : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून फेका, नाही तर कारसेवा करू असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर काल नागपुरात झालेल्या आंदोलनानंतर गालबोट लागले आणि दंगल उसळली. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर गंभीर आरोप केला. नागपूरची दंगल ही फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कबर इथं, मग दंगल नागपूरला कशी झाली? मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर दिसत नाहीत का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. वेरूळमध्ये मालोजी राजांची गढी आहे, तिथे आज शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले. निवडणुका आल्या की असे धार्मिक वाद उकरून काढले जातात. त्यामुळे समाजाने सावध राहावे.
यांचेच सरकार असून हेच कबरीसाठी पैसे देतात, मग कबरही तुम्हीच काढा ना, असा टोला जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला. इथल्या मुसलमानांना औरंगजेबाच्या कबरीबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. नागपूरमध्ये झालेली दंगल ही पूर्णपणे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरस्कृत आहे. यांना तो कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? तिथे हिंदुत्व का जागे होत नाही? असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.
कबर काढायची तर काढा, फक्त गोरगरिबांना झुंजवू नका, असे आवाहन करतानाच निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद करतात, बरं रक्षण ही तुम्हीच करता. ते मूर्ख तर तुम्हीही मूर्ख का? इथं माझ्या मताला काय किंमत? सरकारचे लोक म्हणतात ‘कबर हटाव’. मात्र यामुळे गोरगरिबांना हे अडचणीत आणतात, अशी टीका जरांगे यांनी केली.
किंबहुना मुस्लिम जनतेला माझे आवाहन आहे की कबरीवर प्रेम करू नका. सरकार तुमचे आहे कबर काढायची तर काढू शकता, फक्त गोरगरिबांना झुंजवू नका, याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला. या सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. दिलेले आश्वासन ते पूर्ण करत नाही. तेलंगणा सरकारने ४२ टक्के ओबीसी आरक्षण दिले पण महाराष्ट्रात हे करणार नाही. फडणवीस असे करणार नाहीत. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि पोटापाण्याचे काम करावे, दंगली नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.