लातूर : मार्च अखेर निर्धारीत केलेले वीजबील वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. या मोहिमेत लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्यासह परिमंडलातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी सामील झाले आहेत. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणीही या मोहिमेत करण्यात येत असून अनधिकृतपणे विजेचा वापर करत असल्याचे आढळल्यास विद्युत कायद्यान्वये थेट पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचा इशारा महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.
वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. लातूर परिमंडलात लघुदाब वर्गवाराीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे जवळपास ४ लाख ३३ हजार ४३१ ग्राहकांकडे फेब्रुवारी अखेर असलेल्या ३०१ कोटी ५ लाख रूपयांच्या थकबाकीसह मार्चच्या चालू बिलांचे ११२ कोटी ७ लाख रूपये असे एकत्रीत तब्बल ४१४ कोटी २ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यात धाराशिव मंडलातील १ लाख ३३ हजार ६४३ ग्राहकांकडे ११३ कोटी ५ लाख, बीड मंडलातील १ लाख ४० हजार ४६७ ग्राहकांकडे १६८ कोटी ८ लाख व लातूर मंडलातील १ लाख ५५ हजार ९४८ ग्राहकांकडे ११९ कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी लातूर परिमंडलातील धाराशिव, बीड व लातूर मंडलात महावितरणतर्फे धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचारीही या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. गेल्या १७ दिवसात लातूर जिल्हयातील वीजग्राहकांनी ३६ कोटी ३ लाख रूपयांचा भरणा केला आहे, बीड जिल्हयातील वीजग्राहकांनी १९ कोटी ७ लाख रूपयांचा भरणा केला आहे तर धाराशिव जिल्हयातील वीजग्राहकांनी १४ कोटी ७ लाख रूपयांचा भरणा केला आहे.
अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
लातूर शहरातील गंजगोलाई परिसर तसेच शहराच्या उत्तर व दक्षिण उपविभागातील थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची सोमवारी (१७ मार्च) अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांच्यासह मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी स्वत: पडताळणी केली. यावेळी थकबाकीदार ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला असतानाही वीजबिल भरण्यास प्रतिसाद देत नसतील तर त्यांचे मीटर काढून वीजपुरवठा कायमचा खंडीत करण्याच्या सुचना संबंधीत अभियंत्यांना दिल्या. मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीजबिल वसुलीस वेग आला आहे.
महावितरणची संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. थकबाकीदार ग्राहकही वीजबिल लगेचच भरून मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. सर्व थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकीसह आपले चालू वीजबिल भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान लातूर मंडलातील १२४ वीजग्राहकांचा कायमस्वरूपी तर ३३८ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. बीड मंडलातील ७८ वीजग्राहकांचा कायमस्वरूपी तर ११८ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर धाराशिव मंडलातील ६३ ग्राहकांचा वीजग्राहकांचा कायमस्वरूपी तर १९४ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे.
पुनर्जोडणी शुल्काचा आर्थिक भुर्दंड
वीज ग्राहकांनी वेळेत वीज देयक भरणे आवश्यक आहे. महावितरणची कारवाई झाल्यानंतर संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याची नोंद महावितरणच्या ऑनलाइन य प्रणालीत करावी लागते. त्यामुळे सिंगल फेज ग्राहकांना ३१० रुपये व जीएसटी आणि थ्री फेज ग्राहकांना ५२० रुपये व जीएसटी पुनर्जोडणी शुल्क भरावेच लागणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.