26.7 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रद्वेष पसरविणा-या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

द्वेष पसरविणा-या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

काँग्रेस आमदारांचे विधानभवनात आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
औरंगजेबाची कबर, मल्हार मटण सारखे मुद्दे उपस्थित करून व प्रक्षोभक वक्तव्ये करून मंत्री नितेश राणे राज्यात अशांतता पसरवत आहेत. जातीधर्मात वाद निर्माण करण्याचे उद्योग करत आहेत. त्यांची तत्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करत काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पाय-यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

त्याचवेळी औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करणा-या शिवसेना आमदार व विरोधकांमध्ये घोषणायुद्ध सुरू झाल्याने वातावरण तापले होते. औरंगजेबाची कबर, मल्हार हिंदू मटण आदी मुद्यावर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत, वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मंत्री असूनही बेताल वक्तव्ये करणा-या नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशी विरोधकांची मागणी आहे. त्यासाठी आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर फलक फडकवत घोषणाबाजी केली. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तेथे औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी पाय-यांवर आंदोलन करत होते.

त्यामुळे यावेळी त्यांच्यात घोषणायुद्ध सुरू झाले होते. हे घोषणायुद्ध हातघाईवर येऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांचे प्रयत्न सुरू होते. आंदोलनाचे चित्रण करणा-या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधी व सुरक्षारक्षकांचीही बाचाबाची झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आंदोलन थांबले व अनुचित प्रकार टळला.

मूलभूत प्रश्न टाळण्यासाठी पेटवापेटवी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नितेश राणेंच्यावर टीका करताना मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे बाजूला करण्यासाठी हा घाट घातला जात आहे अशी टीका त्यांनी केली. मी फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली व आजही मी माझ्या विधानावर ठाम आहे.

औरंगजेबने फितुरी, फोडाफोडी केली म्हणून आम्ही त्याला क्रुर म्हणतो. फडणवीस यांच्या काळात हे सर्व करणा-या टोळ्या सक्रिय आहेत. संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, महिला अत्याचार वाढले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. औरंगजेबाने जसा जिझिया कर लावला होता तसाच कर आता सरकारने लावला आहे अशी टीका त्यांनी केली.

नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांची तंबी; राणेंचा मात्र इन्कार
प्रक्षोभक वक्तव्ये करून वाद निर्माण करणा-या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दालनात बोलावून समज दिल्याची चर्चा आज विधानभवनात होती. नितेश राणे यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझे नाव आहे, त्यामुळे मला तंबी देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत याचा इन्कार केला. नागपूरला पोलिसावर हल्ला करण्यात आला. असा प्रकार घडल्यानंतर आमचे देवाभाऊंचे सरकार गप्प बसेल का? संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

कबर हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ करणा-या औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी आज विधान भवनातील पाय-यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात मंत्री भरत गोगावले, प्रकाश आबिटकर हे ही सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR