लातूर : प्रतिनिधी
तरुणांचा सळसळता उत्साह, जाणकार रसिकांनी लावलेली हजेरी, तसेच नवीन प्रेक्षकांनी दाखवलेली उत्सुकता नुकत्याच झालेल्या तिस-या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वैशिष्ट्ये ठरली. दि. १४ ते १७ मार्च दरम्यान पीव्हीआर थिएटरमध्ये हा महोत्सव पार पडला.
विलासराव देशमुख फाउंडेशन, महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा महोत्सव होतो. नुकताच झालेला हा तिसरा महोत्सव होता. या चार दिवसात २५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात आले. यामध्ये मराठी भाषेतीत ३ तर इतर भारतीय भाषांमधील ४ चित्रपटांचा समावेश होता. महोत्सवाची सुरुवात ‘आर्मंड’ या नॉर्वेजियन चित्रपटाने झाली. तर समारोप ‘टू अ लॅन्ड अननोन’ या चित्रपटाने झाला. पौंगडावस्थेतील मुलांचे लैंगीक प्रश्न ‘आर्मंड’ने मांडला तर स्थलांतरित लोकांचा ज्वलंत प्रश्न समारोपाच्या चित्रपटाने सादर केला. पॅलेस्टाईन स्थलांतरितांची ससेहोलपट दाखविणार्या ‘टू अ लॅन्ड अननोन’ या आठ देशांची संयुक्त निर्मिती असलेल्या अप्रतिम कलाकृतीने महोत्सवाचा समारोप साला. तत्पूर्वी मराठी चित्रपट विभागात ‘निर्जली’च्या शो ला रसिकांनी इतकी गर्दी केली की पूर्ण थिएटर भरले.
‘निर्जली’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका व प्रमुख भूमिका साकारलेल्या स्वाती कडू-लोखंडे यावेळी उपस्थित होत्या. तसेच चित्रपटातील काही कलाकार उपस्थित होते. या चित्रपटाला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विलासराव देशमुख काऊंडेशनचे डॉ. बालाजी वाकुरे यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत केले.
चित्रपट महोत्सवात ‘स्रो फ्लावर’ (दिग्दर्शक- गजेंद्र अहिरे), ‘सांगळा’ (दिग्दर्शक रावबा गजमल) व ‘निर्जळी’ (दिग्दर्शक स्वाती कडू) हे तीन मराठी चित्रपट होते. यातील रावबा गजमल हे मराठवाड्यातील कलावंत असून त्यांनी आतापर्यंत काही शॉर्ट फिल्म केल्या आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. तिन्ही मराठी चित्रपटांना थिएटर पूर्ण भरले होते. याशिवाय चार चित्रपट इतर भारतीय भाषांमधील होते. यामध्ये ‘इन रिट्रिट’ (दिग्दर्शक मैसम अली), ‘तारीख’, (दिग्दर्शक हिमज्योती तालुकदार), ‘लेव्हल क्रॉस’ (दिग्दर्शक अरफाज आयुब) व ‘लच्ची’ (दिग्दर्शक कृष्णेगौडा) या चार चित्रपटांचा समावेश होता.
महोत्सवात १६ जागतिक चित्रपट दाखविले गेले. यामध्ये ‘प्लास्टीक गन’, ‘डेलीरियो’, ‘डार्क मॅटर’, ‘ब्लॅक टी’, ‘आउट ऑफ सिझन’, ‘मदर्स किंग्डम’, ‘शहिद’, ‘व्हीएत अॅड नाम’ आदी उल्लेखनीय होते. जागतिक सिनेमा विभागात युरोपियन, उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया व आशियाई देशांमधील विविध भाषांमधील सोळा चित्रपट महोत्सवात निवडण्यात आले. अन्न, वस्त्र व निवार्यासाठी होणारी स्थलांतरे व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम तसेच पर्यावरण हानी आणि मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत व स्त्री- पुरुष संबंध असे विविध विषय हाताळणारे हे चित्रपट होते, अशा रसिकप्रिय चित्रपटांची मेजवानी चार दिवस चालणा-या या महोत्सवात प्रेक्षकांना मिळाली. हा फेस्टिवल जनतेसाठी खुला होता व यात नि:शुल्क प्रवेश होता.