27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाहैदराबादची विजयी सलामी

हैदराबादची विजयी सलामी

राजस्थानचा ४४ धावांनी पराभव

हैदराबाद : आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुस-या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव दिसला. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय चुकला असेच म्हणाव लागेल. कारण सनरायझर्स हैदराबादचा बॅटिंग लाईनअप पाहता मोठी धावसंख्या होणार याचा अंदाज होता. झालेही तसेच अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन नावाचे वादळ घोंगावले. त्याने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेडने ३१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या.

या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून २८६ धावा केल्या आणि २८७ धावा विजयासाठी दिल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडला. राजस्थान रॉयल्सने २० षटकात ६ गडी गमवून २४२ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात ४४ धावांनी पराभव झाला. त्यामुळे नेट रनरेटवर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे.

विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग स्वस्तात बाद झाले. यशस्वी जयस्वाल फक्त १ धाव, तर रियान पराग ४ धावा करून बाद झाले. नितीश राणाकडून अपेक्षा होत्या. मात्र तोही काही खास करू शकला नाही. त्याचा डाव ११ धावांवर आटोपला. त्यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी डाव सावरला. संजू सॅमसनने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने ६ चौकार आणि तीन षटकार मारले. संजू सॅमसननंतर ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी केली. पण दोघे बाद झाल्यानंतर राजस्थानचा पराभव निश्चित झाला. संजू सॅमसन ६६, तर ध्रुव जुरेल ७० धावा करून बाद झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR