छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील ऊन आता मार्च महिन्यातच जाणवू लागले आहे. दरम्यान उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे. सोयगाव तालुक्यात ही घटना घडली आहे.
कडक उन्हाचा फटका राज्यभर जाणवत आहे. राज्य सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यावर देखील यांचा परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंश दरम्यान पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. दरम्यान महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाची ओळख आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होताना दिसत आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी तीव्र उन्हाळ्याने घटू लागली असून नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडू लागले आहे, त्यामुळे जलाशयातील बेटे दिसू लागली आहेत. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेची पाणी पातळी यावर्षी शंभर टक्के भरली होती. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वीजनिर्मिती, शेतीसाठी व पिण्याचे पाणी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणी दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषत: सोळशी व कोयना नदीच्या खो-यातील तापोळ्याच्या वरील भागातील पाणी वेगाने कमी होऊन या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या भागातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठीही नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढत आहे. त्यामुळे पर्यटक संख्याही कमी होऊ लागली आहे.
पुण्यात ‘पाणीबाणी’
एकीकडे समान पाणी पुरवठा (चोवीस तास) योजनेचे काम सुरू असले तरी टँकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढत आहे. यावर्षी टँकरच्या सुमारे चार लाख ४ हजार इतक्या फे-या झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत टँकरच्या फे-या वाढत आहेत. जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.