पुणे : प्रतिनिधी
राज्यातील काही भागांत वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा उन्मळून पडल्या आहेत. काही ठिकाणी हाताला आलेल्या ज्वारी पिकाचेही नुकसान झाले आहे. जोरदार वा-यामुळे आंब्याला गळती लागली आहे. सांगली, मिरज, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे. जत तालुक्यामध्ये वादळी वा-यासह पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. जतमध्ये काही ठिकाणी तयार झालेले द्राक्ष घडांसह कोसळले आहेत. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिरज शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे मिरज शहरामध्ये काही वेळातच अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. वादळी वा-यामुळे बेदाणा शेडवरील ताडपत्री तसेच अनेक ठिकाणी घरांवरील पत्रेदेखील उडून गेले आहेत. या वेळी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.
सोलापूर जिल्ह्यातील शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वा-याचा फटका बसला.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरासमधील टरबूज बाग मातीमोल झाली. एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस चाळीशीच्या पलीकडे जात असल्याने फळपिकांना तग धरणे कठीण झाले असताना हे संकट आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातही लोहारा, कानेगाव, कास्ती या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्याने शेतातील ज्वारी, द्राक्षे व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.