मुंबई : दिशा सालियानचे प्रकरणावरून आज (२६ मार्च) पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांच्या वकिलाने मंगळवारी (२५ मार्च) पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपाचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, तर विधान परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली.
दरम्यान, विधानसभेनंतर विधान परिषदेतही दिशा सालियान प्रकरणाचे पडसाद उमटले. आमदार भावना गवळी यांनी म्हटले की, सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप केले आहेत, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. यासाठी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भावना गवळी यांनी केली.
या मागणीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, आदित्य ठाकरे हे विधिमंडळ सदस्य आहेत आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. पण हे प्रकरण ५ वर्ष पूर्वीचे आहे. त्या प्रकरणातील जी मुलगी आहे, तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत म्हटले की, दिशा सालियान यांच्या वडिलांनी दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जसा राजीनामा दिला, तसा राजीनामा आदित्य ठाकरे देणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तर दुसरीकडे भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले की, सुशांतसिंग राजपूतचा जिथे मृत्यू झाला, ते घर उद्धव ठाकरे सरकारने लगेच परत का केले? रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते हे ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यामुळे सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका होती? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली. यानंतर विरोधकांनी आदित्य ठाकरेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी म्हटले की, ही घटना ५ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे आता चर्चा करण्याची गरज नाही. मगाशी एक सदस्य या विषयावर बोलले, त्यानंतर मंत्री बोलले, परत आता तोच विषय काढला जात आहे. पण ही घटना ५ वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे आता या विषयावर चर्चा नको, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तर आमदार वरुण सरदेसाई यांनी म्हटले की, राम कदम यांनी ड्रामा करून सर्व प्रकरण सांगितलं आहे. केंद्र सरकारकडे सीबीआय आहे. त्यांनी चौकशी करून आदित्य ठाकरेंना क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे तुमचा आरोप सीबीआयवर आहे का? असा प्रश्न उपस्थित करत वरुण सरदेसाई यांनी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यामुळे सत्ताधारी आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी वेलमध्ये उतरून गोंधळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.