मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्रेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिका-यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्रेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्रेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्रेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदाताई म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली.
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.
नुसत्या भाषणांनी पक्ष वाढणार नाही त्या भाषणातून फक्त विचार घेता येतात. लोकांपर्यंत जाऊन काम करायला हवे असे सांगतानाच तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी आज प्रवेश केलेल्या पदाधिका-यांना दिला.