नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने अमेरिकेला जबर धक्का दिला आहे. भारताची गुप्तचर संस्था रॉ विरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने प्रतिबंध लावण्याचे कारस्थान रचले होते. हा रिपोर्टच भारताने झिडकारून लावत हा आयोगच चिंतेचा विषय असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘यूएससीआयआरएफ’च्या ताज्या अहवालात भारताविरोधात आजही पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित मूल्यांकन जारी करण्याची पद्धत सुरूच आहे, असा गंभीर आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केला आहे.
वेगळ्या घटनांना चुकीच्या पद्धतीने प्रस्तूत करून भारताच्या चैतन्यशील बहुसांस्कृतिक समाजावर शंका निर्माण करण्याचे सततचे प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न धार्मिक स्वातंत्र्याबद्दलच्या ख-या चिंतेऐवजी जाणीवपूर्वक केलेला अजेंडा दर्शवत आहेत. प्रत्यक्षात ‘यूएससीआयआरएफ’लाच ‘चिंतेचा विषय’ मानले पाहिजे, असे या निवेदनात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
अमेरिका व शेजारी देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना शरण देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून या नेत्यांचा खात्मा केला जात आहे. यामागे भारतीय अधिका-यांचा हात असल्याचा आरोप अमेरिका आणि कॅनडा करत आहेत. यासाठी भारताचा एक वरिष्ठ नेता आणि रॉचा हात असल्याचा त्यांचा दावा आहे. हा दावा भारताने खोडून काढला आहे.