30.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रअंधारे, कामराविरुद्ध हक्कभंग

अंधारे, कामराविरुद्ध हक्कभंग

पुढील कारवाईसाठी प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबणात्मक गाण्यातून टीका करणारा कुणाल कामरा आणि तेच गाणे, त्याच चालीवर बोलून दाखविणा-या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत हक्कभंग दाखल केला. सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची सूचना दाखल करून घेत पुढील कारवाईसाठी विशेषाधिकार समितीकडे पाठवित असल्याचे घोषित केले. विधानसभेतही शिवसेनेचे रमेश बोरनारे यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले होते. मात्र, कामराच्या गाण्याचे शिवसेनेकडून (ठाकरे) समर्थन करण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर कामराचे समर्थन करताना ते गाणे माध्यमांसमोर म्हणून दाखवले. भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विधानाचा दाखला देत अंधारे आणि कामरा यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग मांडला.

उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे भाष्य करणे अयोग्य आहे. त्यामुळे अंधारे यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे, असे सांगतानाच आपण मांडलेला हक्कभंग दाखल करून घेण्याची मागणी दरेकर यांनी केली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवीत असल्याचे जाहीर केले.

विधानसभेत अंधारेंच्या
विरोधात हक्कभंग !
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेतही हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेनेचे रमेश बोरनारे यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला असून त्याच्यावरील कार्यवाहीचा निर्णय विधानसभाध्यक्ष घेतील असे स्पष्ट केले.

अधिवेशनाचे सूप वाजले
गेले ४ आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन ३० जून २०२५ पासून सुरू होईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले. ३ मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. एकूण १६ दिवस कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR