28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूर११ हजार ३१६ ग्राहकांना‘अभय’चा लाभ

११ हजार ३१६ ग्राहकांना‘अभय’चा लाभ

लातूर : प्रतिनिधी
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरणने सुरु  केलेल्या अभय योजनेचा लाभ घेत लातूर परिमंडळातील ११ हजार ३१६ वीजग्राहकांनी १६ कोटी ६ लाख रुपयांची थकबाकी भरत पुनर्जोडणी घेतली आहे. अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे. उरलेल्या पाच दिवसात पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
लातूर जिल्ह्यातील ५ हजार २३६ वीजग्राहकांनी ३ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी भरत १ कोटी ४९ लाख रूपयांची माफी मिळवली आहे. यामध्ये लातूर विभागाच्या १ हजार ९१ ग्राहकांनी ८७ लाख रूपयांचा भरणा करत ३५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर निलंगा विभागातील २ हजार २९७ ग्राहकांनी १ कोटी ४५ लाख रूपयांचा भरणा करत ५५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तसेच उदगीर विभागातील १ हजार ८४८ ग्राहकांनी १ कोटी १९ लाख रूपयांचा भरणा करत ५९ लाख रूपयांच्या माफी मिळाल्याचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीज खंडीत केलेल्या २ हजार ३१३ वीजग्राहकांनी १ कोटी ५५ लाख रूपयांचा भरणा करत १ कोटी १४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. यामध्ये तूळजापुर विभागातील ८३७ वीजग्राहकांनी ६५ लाख रूपयांचा भरणा करत ३८ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर धाराशिव विभागातील १४७६ वीजग्राहकांनी ९० लाख रूपयांचा भरणा करत ७६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
बीड जिल्हयातील ३ हजार ७६७ वीजग्राहकांनी १० कोटी ९९ लाख रूपयांचा भरणा करत ८ कोटी ४३ लाख रूपयांची भरघोस सुट प्राप्त केली आहे. यामध्ये आंबाजोगाई विभागातील १०६८ वीजग्राहकांनी ७ कोटी ७५ लाख रूपयांचा भरणा करत ५ कोटी २० लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर बीड विभागातील २ हजार ६९९ वीजग्राहकांनी ३ कोटी २४ लाख रूपयांचा भरणा करत ३ कोटी २४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला किंवा ताबेदारास थकबाकी भरावीच लागते.  त्यामुळे वीजबील थकीत असलेल्या ग्राहकांनी पाच दिवसात अभय योजनेचा लाभ घ्यावा. दोनवेळा मुदतवाढ मिळालेल्या या योजनेस पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. यासोबतच सुरुवातीस मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीही सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने वीजजोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ पाचच दिवस शिल्लक असून, थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या लातूर  परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR