मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच चाकरमान्यांसह इतर प्रवाशांची गावी जाण्याची किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी लगबग सुरू होते. दोन-तीन महिन्यांआधीपासूनच चाकरमान्यांची तिकिट आरक्षणासाठी तिकिट काऊंटरवर मोठी रांग लागते. यामुळे अनेकांच्या तिकिट बुकिंग कन्फर्म होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जादा वाहतूक सोडण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत जादा वाहतूक सोडण्याचे आयोजन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुटीमध्ये चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी मोठी गर्दी पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फे-यांचे नियोजन केले आहे. तसेच या सर्व फे-या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गावी व फिरण्यासाठी जाणा-या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे एसटी विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत एसटीमार्फत नियोजित फे-यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फे-या संबंधित आगारातून चालवल्या जातात. उन्हाळी सुट्यांमुळे परगावी जाणा-या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फे-या रद्द करून, त्याऐवजी लांब पल्ल्याच्या फे-या सुरू केल्या जातात.
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशांची गर्दी होणा-या मार्गावर १५ एप्रिल २०२५ पासून जादा फे-या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गांवरील ७६४ जादा फे-यांना मंजुरी देण्यात आली असून, या जादा फे-यांव्दारे दैनंदिन ५२१ नियतांव्दारे २.५० लाख किमी चालविण्यात येणार आहे.
तिकिट बुकिंग करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
उन्हाळी जादा फे-या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा. प. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर व मोबाईल अॅपव्दारे याबरोबरच रा. प. महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुटीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळामार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा. प. महामंडळाव्दारे करण्यात येत आहे, असे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिका-यांनी म्हटले आहे.