मुंबई : प्रतिनिधी
गेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी (२६ मार्च) सूप वाजले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. मात्र याच अधिवेशनावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.
दरम्यान, गेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी (२६ मार्च) सूप वाजले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण १६ दिवस अधिवेशनात कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. मात्र याच अधिवेशनावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या अधिवेशनाकडे आपण पाहिले, तर पाशवी बहुमत मिळवल्यानंतर काही मिळणार नाही, असे हे अधिवेशन होते. अपयश आणि अस्वस्थता लपवणारे हे अधिवेशन होते. हे सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांत आम्ही काय करणार आहोत, सांगितलं गेलं होतं. पण त्याचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्यांना हमीभाव मिळत नाही. वनविभागाला न्याय मिळत नाही. या १०० दिवसांच्या आराखड्यातील एकही गोष्ट या सरकारने पूर्ण केलेली नाही किंवा त्याबाबत निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले नाही. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक हत्या घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. शांत असलेल्या नागपूरमध्ये दंगल झाली. माझा तर संशय आहे की, ज्या लोकांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे, त्यांनी अशा घटना घडवल्या आहेत का? असा संशय ठाकरेंनी व्यक्त केला.
कबरीपासून कामरापर्यंत असे हे अधिवेशन
उद्धव ठाकरे म्हणाले की, कबरीपासून कामरापर्यंत असे हे अधिवेशन झाले. जयंत पाटील म्हणाले, ते बरोबर आहे. कारण या अधिवेशनात सत्ताधा-यांचा माज दिसला. त्यामुळे विरोधी पक्षाने राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात हे सांगितले.
सौगात-ए-मोदी हे एक निर्लज्ज उदाहरण
उद्धव ठाकरे यांनी सौगात-ए-मोदी या मोदी सरकारच्या योजनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘‘शिवसेनेला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे आणि मुस्लिम समाज आमच्या पाठिशी उभा राहिल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. यांनी लगेच आरोळी उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. महाराष्ट्रातील काही बोगस हिंदुत्ववादी ओरडत बसतात त्यांना एक चापट बसली आहे. कारण ईदच्या निमित्ताने सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. ३६ लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी ३२ हजार भाजपचे कार्यकर्ते हे त्यांना सौगात-ए-मोदी देणार आहेत. मात्र हे काय सौगात-ए-मोदी नाही तर हे सौगात-ए-सत्ता आहे. हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं हे निर्लज्ज उदाहरण आहे,’’ असे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार?
महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे नारे देण्यात आले. आता सौगात म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची… असा हा प्रकार आहे. आमच्या येथे काही उडाणटप्पू आहेत. त्यांचा उल्लेख अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये केला आहे. ते सुद्धा आता टोपी घालून सौगात घेऊन जातात हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचे हे ढोंग उघड पडले आहे. मोदी जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.