नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ट्रेन हायजॅक करण्यात आली होती. या घटनेमुळे पाकिस्तान-बलुचिस्तानमधील वाद पुन्हा जगासमोर आला. याच पार्श्वभूमीवर चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होणा-या हल्ल्यांमुळे चीनने आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
चीनने अलीकडेच पाकिस्तानमधील ‘सिपेक’ प्रकल्पात काम करत असलेल्या आपल्या अभियंते आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी करार केला आहे.
चीनने संयुक्त सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या तीन खाजगी कंपन्यांवर सोपवली आहे. पहिल्या टप्प्यात सिंध प्रांतातील दोन सिपेक ऊर्जा प्रकल्पांवर ६० चीनी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक सुरक्षेत गुंतलेल्या पाकिस्तानी लष्करावर नजर ठेवतील.
चीनचा पाकिस्तानी सुरक्षेवर विश्वास नाही?
‘सिपेक’ अंतर्गत सुमारे ६,५०० चीनी नागरिक सिंध प्रांतातील थार कोळसा ब्लॉकमध्ये दोन ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहेत. गुप्तचर अहवालानुसार, चिनी नागरिकांच्या पहिल्या सर्कलमध्ये चिनी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चिनी नागरिकांचा बाहेरील लोकांशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी असे करण्यात आले आहे. सुरक्षा कर्मचारी कामगारांच्या नियोजित हालचाली सुनिश्चित करतील. ही योजना इतर सुरक्षा मंडळांमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करासोबत शेअर केली जाईल.
पंजाबातील ५ जणांची हत्या
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा अज्ञात बंदूकधा-यांनी पंजाबमधील पाच जणांना प्रवासी बसमधून खाली ओढून गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्वादर जिल्ह्यात हा हल्ला झाला तेव्हा बंदूकधा-यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात कराचीला जाणा-या बसमधील पाच प्रवाशांची हत्या केली.