30.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeक्रीडालखनौने हैदराबादला नमविले

लखनौने हैदराबादला नमविले

१७ व्या षटकातच गाठले १९१ धावांचे लक्ष्य शार्दुल ठाकूर सामनावीर

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १८ व्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सने आपला पहिला विजय नोंदवला. गुरुवारी, संघाने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर ५ विकेट्सने पराभूत केले. ३४ धावांत ४ बळी घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला.

हा सामना सुरु होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दहशत होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी घ्यावी असं अनेकांचे मत होते. पण ऋषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचे निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबाद धावांचा डोंगर रचणार असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. शार्दुल ठाकुरने पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कंबरडे मोडले. अभिषेक शर्मा आणि इशान किशनची विकेट काढली. त्यामुळे धावगती मंदावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या.

ट्रेव्हिस हेडकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. प्रिंस यादवने त्याची विकेट काढली. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. यासह विजयासाठी २० षटकात १९१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान ५ गडी गमवून १७ व्या षटकात लखनौने पूर्ण केले.

सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेले आव्हान गाठताना लखनौला पहिला धक्का बसला. संघाच्या ४ धावा असताना एडन मार्करम १ धाव करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी दुस-या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनने २६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकार मारत ७० धावा केल्या. पूरन बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने मोर्चा सांभाळला. त्याने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तीन विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि आयुष बदोनी ही जोडी मैदानात राहिली. ऋषभ पंत या सामन्यातही आक्रमक आणि साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला. फक्त १५ धावा करून बाद झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR