29.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रभोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज मिळणार

भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज मिळणार

शेतक-यांना दिलासा, महसुल मंत्री बावनकुळे यांची माहिती

मुंबई : राज्यातील भोगवटादार वर्ग-२ म्हणून जमीन धारण करणा-या शेतक-यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणा-या अडचणी दूर करून, आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

शेतक-यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतक-यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग-२ असेल, तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतक-यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत.

जिवंत सातबारा देण्याची मोहीम १ एप्रिलपासून
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबविण्यात येईल. महसूल विभागाकडून स्वत:हून वारसांची नोंद करण्यात येईल. अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेईल. मृत व्यक्तींची नावे सातबा-यावरून कमी करून वारसांची नोंद केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.

शासकीय दाखल्यांसाठी अभियान
बावनकुळे म्हणाले, प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून वर्षाला किमान १,६०० शिबिरे घेतली जातील. रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड वाटप आदी महसूल विभागाशी संबंधित सर्व तक्रारी आणि अर्ज एका ठिकाणी हाताळले जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR