बारामती : राज्यातील शेतक-यांनी पीक कर्जाची रक्कम येत्या ३१ मार्च पूर्वी बँकेत जमा करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून येत्या वर्षी आणि पुढच्या वर्षीही पीक कर्जमाफी होणार नसल्याची स्पष्टोक्ती शुक्रवार दि. २८ मार्च रोजी येथे दिली.
बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. मी राज्यातल्या जनतेला सांगतो ३१ तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितले होते, ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असे स्पष्टपणे अजित पवारांनी सांगितले आहे.
राज्यातील शेतक-यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतक-यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतक-यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार नसल्याचे एकदा स्पष्ट झाले आहे.
पैशाचे सोंग आणता येणार नाही
आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते.