मुंबई : भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. उद्धव ठाकरेंचे खासदार जेव्हा निवडून आले, तेव्हा त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे याचे हिंदुत्व पायदळी तुडवले, मतांच्या लांगुलचलनासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. म्हणून मी म्हटले होते उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत, पुढच्या काळात ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचे मला काही ऐकू येत नाही, महाराष्ट्राच्या जनतेनेही त्यांना ऐकने सोडलेले आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलून काही फायदा नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर मात्र बोलणे टाळले आहे. अंतिम रिपोर्ट येईपर्यंत यावर जर काही बोललो तर ते घाई-घाईत बोलल्यासारखे होईल, विषय डायव्हर्ट होऊ शकतो असे बावनकुळे यांनी यावेळी म्हटले आहे.