बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू झाली असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत बीड न्यायालयात दोन दिवसांपूर्वीच पहिली सुनावणी झाली. यावेळी, उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू मांडताना आरोपींच्या कृष्णकृत्याचा कित्ताच गिरवला. तसेच, सीआयडी पोलिसांच्या तपासात हा खून खंडणीसाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींनी याची कबुली दिल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सध्या या गुन्ह्यातील ८ वा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आता, याप्रकरणी आणखी नवी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडची एंट्री झाली असून सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याच, पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिलेल्या कुबली जबाबात म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींच्या जबाबात खंडणी प्रकरणाचा उल्लेखच नाही. या दोघांच्या जबाबात आणखी एक वेगळाच खुलासा झाला आहे. दोघांच्या कबुली जबाबात देशमुख हत्या प्रकरणाच्या नव्या थिअरीचा उल्लेख समोर आला. सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा आहे असे फरार आरोपी कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितले होते, त्यातूनही ही मारहाण व हत्या केल्याचे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे.
या दोन्ही आरोपींच्या कबुली जबाबात खंडणीचा उल्लेख नाही, तर सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घ्यायचाय म्हणून आपण संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे जयराम चाटे आणि महेश केदारच्या कबुली जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. फरार कृष्णा आंधळेने या दोघांना असे सांगितले होते की, सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुनच सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थानी सुदर्शन घुलेला मारहाण मारहाण केली. त्यामुळे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक अण्णाची बदनामी झालीय, त्याचा आपल्याला बदला घ्यायचाय, असे सांगत चाटे आणि केदारला कृष्णा आंधळेने सोबत घेतले होते.
कोण आहे सुग्रीव कराड?
सुग्रीव कराड हा बीड जिल्ह्याच्या केजमधील रहिवाशी असून तोही स्थानिक गुंड असल्याची माहिती आहे. आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत त्याने काम केले आहे. केज नगरपंयायत निडणुकीवेळी सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीपर्यंत तो खासदार सोनवणेंचा विरोधक होता. मात्र, सध्या तो खासदार बजरंग सोनवणेंसोबत आहे. तर, तो राजकीय व्यक्ती असून पंयायत समितीच्या निवडणुकीत त्याने आपल्या आईला निवडून आणले आहे.