लातूर : प्रतिनिधी
भारतात दरवर्षी कमीत कमी १००० भूकंपाचे धक्के जाणवतात. यातही दोनशे ते अडीचशे वेळा जमीन हादरते. अन्य भूकंप हे कमी तीव्रतेचे असतात. धक्कादायक बाब म्हणजे देशाचा ५९ टक्के हिस्सा हा भूकंपाच्या उच्च स्तराच्या धोक्याच्या परिघात येतो. सर्वाधिक धोका हा हिमालयीन भागात आहे.
१८९७ मध्ये शिलाँग पठारावर ८.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. कांगडा येथे १९०५ मध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप, १९३४ मध्ये बिहार-नेपाळ सीमेवर ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप, १९५० मध्ये अरुणाचल-चीन सीमेवर ८.५ रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दोन खंडांच्या टेक्टोनिक प्लेट्स या भागांच्या जवळ आढळतात. यामुळे या भागात मध्यम ते धोकादायक पातळीचे भूकंप होत असतात.
भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि तिबेटी प्लेट एकमेकांना धडकत असतात. यामुळे दाब निर्माण होतो. त्यामुळे भूकंप होतो. या संपूर्ण २४०० किलोमीटर परिसरात सर्वाधिक धोका आहे. भारतीय मानक ब्युरोने देशाची पाच वेगवेगळ्या भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे.
१९९३ च्या लातूर भूकंपाने ३० सप्टेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे ३:५६ वाजता धक्का दिला होता. लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे प्रभावित झालेले मुख्य क्षेत्र होते, ज्यामध्ये लातूरचा औसा ब्लॉक आणि उस्मानाबादचा उमरगा यांचा समावेश होता. इंट्राप्लेट भूकंपात ५२ गावे उद्ध्वस्त झाली होती.
या भूकंपाला किल्लारीचा भूकंप म्हणून ओळखला जातो. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडली तर १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला होता. सुमारे १६,००० लोक जखमी झाले होते. ५२ गावांतील ३० हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली, तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते.