लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील २० वर्षीय भावेश संतोष तिवारी यांने आपल्या मृत्यूनंतरही सहा जणांना जीवनदान दिले आहे. दि. १९ मार्च रोजी दुचाकी अपघातात लातूर शहरातील भावेश संतोष तिवारी वय २० राहणार हमाल गल्ली लातूर या तरुणाचा रंगपंचमीच्या दिवशी आपल्या आईला सत्संगला घेऊन जात असताना शहरानजीक असलेल्या वासनगाव पाटीजवळ त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
रंगपंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भावेश आपल्या आईसोबत औसा रस्त्यावरील वासनगाव येथील राधास्वामी सत्संग मंडळाच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी निघाला होता मात्र समोरून येणा-या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने भावेश जखमी झाला. त्याची आई अरुणा तिवारी ही जखमी झाली. प्राथमीक उपचारासाठी त्याला शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले. तब्बल ९ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर गुरूवारी डॉक्टररांनी त्याला ब्रेन डेड घोषीत केले.
तिवारी कुटुंबावर हा मोठा आघात होता. अशा कठिण क्षणीही, डॉक्टरांनी अवयवदानाच्या संकल्पनेची माहिती दिल्यानंतर वडिल संतोष तिवारी व कुटुंबीयांनी एक महान निर्णय घेवून भावेशचे दि. २७ मार्च रोजी हैदराबाद येथे दोन्ही मूत्रपिंड, हृदय, दोन डोळे व लिव्हर याचे दान करण्यात आले, त्यातून सहा रूग्णांना नवजिवन मिळणार आहे. यामुळे भावेष आपल्या अवयवांच्या माध्यमातून कायम जिवंत राहणार आहे. तिवारी कुटुंबीयांच्या या महान त्यागामुळे त्यांचा लाडका मुलगा भावेष काहिंमध्ये नवी आशा बनून उरेल. भावेश जरी जगातून निघून गेला असला, तरी त्याच्या या उदात्त कार्यामुळे त्याचे नाव कायम सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. वडील संतोष तिवारी यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, संपूर्ण समाजासाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.