नवी दिल्ली : ईद ३१ मार्चला की १ एप्रिलला साजरी केली जाणार यावरून संभ्रम होता. तो रविवार दि. ३० मार्च रोजी दूर झाला आहे. आता देशभरात ईद सोमवार दि. ३१ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
ऐशबाग ईदगाह येथे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी ही घोषणा केली आहे. ईद उल फित्रचा चंद्र ३० मार्च रोजी दिसला आहे. यामुळे ३१ मार्चला देशभरात ईद साजरी केली जाणार आहे. नमाज सकाळी १० वाजता ईदगाह लखनौमध्ये अदा केली जाईल. नागरिकांनी रस्त्यावर नमाज अदा करू नये. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे त्यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी ईदगाह लखनौ येथे ईदची नमाज अदा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नमाजपूर्वी मौलाना खालिद रशीद फरंगी महाली भाषण देतील. ईद-उल-फित्र हा रमजान उल-मुबारकच्या एका महिन्यानंतर मुस्लिमांनी साजरा करायचा आनंदाचा धार्मिक सण आहे. इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद उल-फित्र साजरी केली जाते.