मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. तर छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते, असेही यावेळी गडकरींनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे संवेदनशील राजे होते, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर असल्याचेही म्हटले. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात गडकरींनी भाषण केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? त्यांनी राज्याचा कारभार कसा चालवला? याबाबतची माहिती दिली.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इंग्रजी भाषेत येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, कार्य-कर्तृत्व याबाबत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. मी इतकेच सांगेन की लहानपणापासून आमच्या हृदयात आई-वडिलांहूनही महत्त्वाचे ज्या व्यक्तीचे स्थान होते, त्या व्यक्तीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते. रामदास स्वामींनी त्यांचे यथार्थ वर्णन केले आहे, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. प्रत्येक गोष्टीत आदर्श कुणी असेल तर ते शिवाजी महाराज. एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले ते उत्तमच होते.
अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली तेव्हा अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला. ज्यानंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा, असे आदेश दिले. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते, अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.
तर, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक लढाया जिंकल्या. पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या, त्यावेळी ते सन्मानाने वागले. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्यासमोर आणली गेली, तेव्हा ते म्हणाले की, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. तिला त्यांनी सन्मानाने घरी पाठवले. कारण आजकाल अनेक लोक आपल्या मुला-मुलींसाठी तिकिट मागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य हेच होते की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.