नाशिक : नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महापालिकेने नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख महापालिकेच्या नोटीसमध्ये आहे. नाशिक महापालिकेने दर्ग्याच्या भिंतीवरच ही नोटीस लावली आहे.
द्वारका भागातील काठे गल्ली सिग्नलजवळील जागेवर सातपीर दर्गा हे धार्मिक स्थळ तयार करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर २३ फेब्रुवारीला नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या दर्ग्याभोवतीचे काही अतिक्रमण काढले होते. त्यानंतर सातपीर दर्गा ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा दर्गा अनधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानुसार महापालिकेने नोटीस बजावून १५ दिवसांत संपूर्ण अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची सूचना केली आहे.
पंधरा दिवसांत ट्रस्टने स्वत:हून बांधकाम काढले नाही तर, पालिका हे बांधकाम काढून घेईल अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान दर्ग्याचे विश्वस्त वक्फ बोर्डाकडे धाव घेतील का? अन्य काही कायदेशीर पर्याय त्यांच्याकडे आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने विश्वस्तांकडून चाचपणी केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या ट्रस्टींना दिलेला अल्टिमेटम बघता दर्ग्यावरून नवा वाद होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
१५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली जाईल असा इशारा मनपाने दिला आहे. मनपाने दर्ग्याच्या भिंतीवर लावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नाशिक महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी ४ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हजरत सैय्यद सात पीर बाबा दर्गा जनरल वैद्य नगर, काठे गल्ली, नाशिक हा दर्गा ‘ब’ वर्ग अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.