छत्रपती संभाजीनगर : वक्फ फायदा आणणे म्हणजे हा भाजपाचा खेडसाळपणा आहे. मुख्य मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे. आम्ही शांत बसणार नाही, मुस्लिम बोर्डाने विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही त्यांना साथ देऊ आणि न्यायालयात जाऊ, असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. हा कायदा म्हणजे देशाची दिशाभूल आहे, फाटक्यात पाय घालू नका, अशी टीका त्यांनी केली.
वक्फ विधेयक त्यांच्याकडे संख्याबळ आहे म्हणून मंजूर होईल, हा कायदा आणणे म्हणजे भाजपाचा खोडसाळपणा आहे. अधिवेशनात मुस्लिम प्रतिनिधी नसताना आम्ही कधी जबरदस्तीने काम करू शकतो, हे त्याचे एक उदाहरण आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचे भाषण ऐकले, हे विधेयक का आणले हे सांगताना त्यांनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी वक्फ कमिटीवर शिया, बोहरी आणि महिला सदस्य असतील, असे सांगितले. मात्र हे सदस्य तर आधीपासूनच आहेत. महिलांच्या नावाने खोटे नाटक का करता? महिलांना आरक्षण देण्यासाठी पाच दिवसांचे अधिवेशन घेतले. कायदा मंजूर केला, मात्र अंमलबजावणी कधी हे का सांगितले नाही, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
इतर समितीवर मुस्लिम बांधव का नाहीत?
वक्फ समितीवर इतर समाजाचे सदस्य नेमण्याची घोषणा केली. मुस्लिम समाजात हुशार शिक्षित माणसे नाहीत का? इतर कोणत्या ट्रस्टवर मुस्लिम व्यक्ती का नियुक्त करत नाहीत, असे प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले. आमच्या फाटक्यात पाय घालू नका, ‘कही पे निगाहें कहीं पे निशाना’ असे धोरण सुरू आहे. हा कायदा का आणला ते पहावं. आधी ट्रिपल तलाक, मांस खाण्याचा मुद्दा, हिजाब, आता अनेक वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब असे मुद्दे बाहेर काढून मूळ मुद्यापासून बाजूला नेले जात आहे. मुस्लिम बोर्डाने विरोध दर्शवला आहे. आम्ही त्यांच्या सोबत आंदोलन करणार आहोत. न्यायालयात देखील जाणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.
आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावर घेणार का?
वक्फ बोर्डात नॉन मुस्लिम सदस्य आणणार हुशार लोकांना संधी देणार म्हणे, मग मुस्लिम समाजात हुशार नाही का? आम्हाला शिर्डी,तिरुपती,शीख बोर्ड वर घेणार का.. फक्त वक्फ साठी हा निर्णय का? असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय. वक्फ बोर्डात बदल गरजेचे होते, तिथं गैरप्रकार झाले आहेत मात्र त्यात असा कायदा नको होता, आधी तिथं घोळ अधिका-यांनी केले आणि सरकारने पाठीशी घातले.अजित पवार मुस्लिम सोबत आहे सांगतात आता कुठे गेले, मुस्लिम पर्सनल बोर्डने बिलाचा निषेध केलाय पुढे जे काही निर्णय ते घेतील ते आम्ही मानणार. त्या पद्धतीने भूमिका ठरवणार असल्याचंही जलील म्हणाले आहेत.