28.4 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeपरभणीएटीएम अफरातफर करून पुतण्याचा काकाला १२ लाखाला गंडा

एटीएम अफरातफर करून पुतण्याचा काकाला १२ लाखाला गंडा

परभणी : एटीएम कार्डची अफरातफर करून बँक खात्यातील ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेत पुतण्यानेचे काकाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार २१ एप्रिल २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार पुतण्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त शिक्षक गोपीनाथ राठोड (रा. आनंदनगर तांडा, पाथरी) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते पत्नीसह राहतात. त्यांनी मुलाने दिलेले १० लाख रुपये १५ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या त्यांच्या खात्यात भरले. यावेळी पुतण्या सुनील सूर्यकांत राठोड (रा. आनंदनगर तांडा) याला ते सोबत घेऊन बँकेत गेले होते.

पैसे भरल्यानंतर बँकेने फिर्यादीस नवीन एटीएम पाकीटमध्ये टाकून दिले. या एटीएमचा पिन पुतण्या सुनील राठोड याने केला होता. त्यावेळी त्याने एटीएम पॉकेटमध्ये एसबीआय बँकेचे गणेश नागरे या नावाचे एटीएम टाकून माझ्याकडे दिले व नवीन एटीएम त्याच्याकडे ठेवले. यानंतर १६ एप्रिल २०२४ ला सुनील राठोड याने फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सुनीता राठोड हिच्या खात्यावर ४० हजार आरटीजीएस केले.

यानंतर त्यांच्या खात्यावर २९ जानेवारी २०२५ रोजी एक लाख जमा झाले. शेतीचे एक लाख देण्यासाठी पुतण्या सुनील याच्यासह ते पैसे काढण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत २० मार्च रोजी गेले होते. त्यावेळी बँक खात्यामध्ये पैसे नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. खात्यात दहा ते अकरा लाख होते, पैसे कसे नाहीत अशी विचारणा केली असता त्यांनी तुमचे पैसे एटीएमद्वारे काढून घेतल्याचे कर्मच-यांनी सांगितले. यावर त्यांनी घरी येऊन एटीएमची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम दिसले नाही. तेथे एसबीआय बँकेचे एटीएम गणेश नागरे यांच्या नावाने होते असे फिर्यादीत म्हटले आहे.

सीसीटीव्हीतून बिंग फुटले
हा सर्व प्रकार घडल्यानंतर राठोड यांनी बँक स्टेटमेंट काढले असता शेवटचा व्यवहार २७ फेब्रुवारी २०२५ ला सोनपेठ येथील बँकेच्या एटीएममधून एक हजार रुपये काढल्याचे समजले. यानंतर त्यांनी पाथरी पोलिसांच्या मदतीने एटीएममधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात पुतण्या सुनील राठोड हा पैसे काढताना दिसला. या प्रकरणी त्यांनी १ एप्रिलला पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पुतण्या सुनील राठोड याच्याविरुद्ध बँक खात्यातील ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक महेश लांडगे करीत आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR