नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा होणार नाही. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प व्होट ऑन अकाउंट असेल, असे त्या म्हणाल्या. सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. सीआयआय-ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरमला संबोधित करताना गुरुवारी सीतारामन म्हणाल्या की, पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेले नवीन सरकार २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर करेल.
सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभेत १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. त्या म्हणाल्या की, हे खरे आहे की १ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्याचे कारण म्हणजे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका. त्यामुळेच सरकार जो अर्थसंकल्प सादर करणार आहे तो नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सरकारी खर्च भागवण्यासाठीच असेल.
फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात त्या मोठ्या घोषणा करणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, “त्यावेळी (व्होट ऑन अकाउंटमध्ये) कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला नवीन सरकार येण्याची आणि जुलै २०२४ मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वाट पाहावी लागेल. अरुण जेटली आजारी पडल्यानंतर अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पीयूष गोयल यांनी २०१९ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.