36.8 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeक्रीडाहर्षित राणाच्या किसचा किस्सा पुन्हा चर्चेत

हर्षित राणाच्या किसचा किस्सा पुन्हा चर्चेत

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणारा २३ वर्षीय जलदगती गोलंदाज हर्षित राणा सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा वादग्रस्त फ्लाइंग किस सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. ज्या प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे त्याला एका बंदीचा सामना करावा लागला होता तसेच सेलिब्रेशन त्याने पुन्हा एकदा केले. पण यावेळी मैदानावर ते जुने तेवर दाखवताना शिक्षा होणार नाही, याची त्याने खबरदारी घेतल्याचे दिसते. नेमके काय आहे प्रकरण आधी शिक्षा झाली त्याच धाटणीतील सेलिब्रेशन करून तो
यावेळी कसा वाचणार?

कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात हर्षित
राणाने अभिषेक शर्माची विकेट घेतल्यावर फ्लाईंग किस सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. २०० धावांचा पाठलाग करताना वैभव अरोराने आधी ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुस-या षटकात हर्षित राणाने स्फोटक बॅटर अभिषेक वर्माला चालते केले. दुस-या षटकातील अखेरच्या चेंडूवर अभिषेक शर्माला त्याने स्लिपमध्ये व्यंकटेश अय्यरकरवी झेल बाद केले. या विकेट्सनंतर त्याने फ्लाइंग किस सेलिब्रेशन केले.

गत हंगामात त्याने एकदा नाही तर दोन वेळा फ्लाइंग किस सेलिब्रेशन केले आणि त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने मयंक अग्रवालची विकेट घेतल्यावर केलेल्या फ्लाइंग किस सेलिब्रेशनमुळे तो वादात सापडला होता. त्यावेळी त्याच्या सामना शुल्कातील ६० टक्के रक्कम कपात करण्याची कारवाई झाली होती. त्यानंतर याच हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पुन्हा तोच तोरा दाखवला. या सेलिब्रेशननंतर मात्र सामना शुल्काच्या १०० टक्के कपातीसह त्याच्यावर एका सामन्याची बंदीची कारवाई झाली होती. हा सर्व प्रकार घडल्यावर गत हंगामात कोलकाताच्या संघाने ट्रॉफी जिंकल्यावर शाहरुख खान याने हर्षित राणाच्या सेलिब्रेशनची नक्कल केल्याचेही पाहायला मिळाले होते.

बीसीसीआयच्या आचारसंहितेनुसार, जर गोलंदाजाने बॅटरकडे पाहून अशा प्रकारची कृती केली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. ही गोष्ट ध्यानात ठेवून हर्षित राणा याने आता प्रेक्षकांकडे किंवा ड्रेसिंग रुमकडे पाहून आपल्या सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशनचा धडाका कायम ठेवल्याचे दिसून येते. अभिषेक शर्माच्या विकेटनंतरही त्याने हेच केले. अभिषेक शर्माला टार्गेट न करता त्याने प्रेक्षकांकडे पाहून आपल्या अंदाजात आनंद व्यक्त केला. त्यामुळेच या सेलिब्रेशमुळे त्याच्यावर कारवाईचे कोणतेही संकट ओढावणार नाही, असेच दिसते. यंदाच्या हंगामातच नव्हे तर गत आयपीएल हंगामात शिक्षा भोगल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो याच तो-यात विकेट्सचे सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले आहे. पण आपली चूक सुधारत त्याने प्रेक्षक किंवा ड्रेसिंग रुमच्या दिशेने पाहून रुबाब झाडल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR