पुणे : येथील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे तसेच पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्राशासनावर कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर नागरिकांकडून तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला १० लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोरही आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यांना तपासूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. याच सोबत भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
१० लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट
रुग्णालयातील प्रशासनाची चौकशीनंतर याचा अहवाल आरोग्य खात्याला देण्यात येणार आहे. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयांनी घ्यावायच्या काळजीबद्दल नियमावली तयार करण्यात येणार असल्याची देखील माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
शिवसैनिकांनी अधिका-यावर चिल्लर फेकली
दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेना ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गटाने जोरदार आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप या रुग्णालयावर लावण्यात येत आहे. तसेच रुग्णालयाच्या या असंवेदनशील कारभारामुळेच महिलेचा जीव गेला असल्याचे म्हटले जात आहे. या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रुग्णालयातील अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांच्यावर चिल्लर फेकण्यात आले. जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार असल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
माहिती दिशाभूल करणारी
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यावर तसेच शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन केल्यानंतर रुग्णालयाच्या अधिका-यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. तसेच दीनानाथ रुग्णालय योग्य ती माहिती प्रशासनाला देणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. यावेळी १० लाख रुपये मागीतल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली नाही.