मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणा-या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे-जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक बोलत होते. सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत, अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, चांगले उत्पन्न देणा-या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमतून महामंडळाला २२-२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न १०० कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.
बसस्थानकावर सुसज्ज महिला प्रसाधनगृहे उभारण्यात यावीत. राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी. एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंड संबंधित संस्थेने एसटीसाठी खर्च करावा, अशी अट समाविष्ट करावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
करारानुसार ५१५० इलेक्ट्रिक बस पैकी केवळ २२० बसेस एसटी महामंडळाला संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याचा करार केलेल्या आणि अद्यापही बस पुरवठा न करणा-या संबंधित संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी. त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचा करार रद्द करण्याची कार्यवाही करावी. यंदा २ हजार ६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी मार्च अखेर ८०० बसेस १०० आगारात दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व २५१ आगारांना नवीन बसेस मिळतील असे नियोजन करावे. महामंडळाच्या नवीन बसेसचे लोकांनी चांगले स्वागत केले आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसेसमध्ये जीपीएस सह सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात यावेत असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्या
राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे. त्या जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते. याबाबत स्थानिक अधिका-यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करुन आपल्या ताब्यात घ्याव्यात. तेथे कुंपण भिंत करावी. तसेच आपल्या विभागाचा नाम फलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सन २०२३ पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. यापुढे या अॅपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणा-या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष रहावे! तसेच अधिका-यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या बदल्या या अॅपद्वारे होतील, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.