कोल्हापूर : प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर सर्वांच्या भावना तीव्र आहेत. उपचारासाठी जे कोणी रुग्ण येतात, त्यांच्यावर पहिल्यांदा उपचार करणे महत्त्वाचे असते. मात्र जी काही घटना पुण्यात घडली त्याबद्दल खेद आहे. या रुग्णालयाबद्दल अत्यंत गंभीर अशा तक्रारी आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील संबंधित विभागांना सूचना दिलेल्या आहेत. रुग्णालयाबद्दल आणि रुग्णालयाकडून झालेल्या चुकांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीत जो काही अहवाल येईल त्यानुसार रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला, ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग आणि पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार चालतात. या दोन्ही कायद्यांनुसार ज्या चुका झाल्या आहेत, त्यानुसार हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल. तसेच हॉस्पिटलला आपला खुलासा करणे गरजेचे होते, तो त्यांनी केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जे काय पाऊल उचलायचं आहे ते उचलता येते. एका बाजूला दोन बाळ जन्म घेत आहेत आणि त्याचवेळी त्यांची आई दगावते, ही अत्यंत दु:खद घटना आहे. या सर्वांचा कायदेशीरदृष्टीने तपास करून कारवाई केली जाईल. लवकरच सर्व हॉस्पिटलसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली जाईल, असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस यश संपादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर जनतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आभार दौरा सुरू केला आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. एका बाजूला संघटना बळकट करण्यासाठी आणि जनतेचे आभार मांडण्यासाठी हा दौरा होत आहे.
शक्तिपीठ महामार्गासंदर्भात या आधीदेखील अनेक आंदोलने, निवेदने झाली आहेत. या विषयासंदर्भात अनेक मतमतांतरे आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन हा महामार्ग व्हावा, अशी आमची भूमिका आहे. आंदोलन करणे हे आंदोलकांचे काम आहे, आंदोलन वेगळे आणि जनतेचे आभार मानणे वेगळे आहे. आभार दौरा हा आनंदाचा, जल्लोषाचा आणि उत्साहाचा आहे. यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येत आहेत. त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.