परभणी : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जिममध्ये घाम गाळणे हे सामान्य झाले असले, तरी काही तरूण ‘शॉर्टकट’ मार्गाने शरीर कमावण्याच्या नादात आरोग्याशी खेळ करू लागले आहेत. असेच एक प्रकरण परभणीत उघडकीस आले असून नवामोंढा पोलिसांनी झडप घालत एकाला ‘टरमाइन इंजेक्शन’सह अटक केली आहे. देशात प्रतिबंधीत औषधांचा वापर करून तरूणांच्या शरीरावर झटपट करणारे इंजेक्शन विक्रीसाठी ठेवले होते. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शुक्रवारी पोलिसांच्या एका पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शेख महेबूब शेख मजीद या तरूणाला ताब्यात घेतले. त्यावेळी तो प्रतिबंधीत ड्रग्ज बाळगून होता व जिममधील इतर तरूणांनाही तो विक्री करणार होता. त्याच्याकडे १० हजार रूपये किंमतीचे टरमाईन इंजेक्शन व एक दुचाकी मिळाली. पोलिसांनी दोन्ही जप्त करून नवा मोंढा पोलिस ठाण्यात त्याच्या विरूध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पथकामध्ये पोउपनि. ढेमकेवाड, पोलिस कर्मचारी विजय बांगर, रूपेश कोळेकर, शुभम करकले, पुरूषोत्तम तेजनकर यांचा समावेश होता. या घटनेचा पुढील तपास पोउपनि. देशमुख करीत आहेत.
तरूणांनी सावध राहण्याचा पोलिसांचा इशारा
शरीर सौष्ठवसाठी झटपट परिणाम देणा-या औषधांचा वापर तरूणांमध्ये वाढत आहे. परंतू या औषधांचा गैरवापर दिर्घकाळात गंभीर आरोग्यविषयक परिणाम करतो. त्यामुळे युवकांनी या प्रकारापासून दूर रहावे असा सल्ला पोलिस प्रशासनाने दिला आहे.
विशेष पथकाची नेमणूक; जीममध्ये झाडाझडती सुरू
टरमाइन इंजेक्शनचा घातकी प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याची पाळेमुळे शोधण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. अटक केलेल्या शेख महेबुब शेख मजीद याच्याकडे इंजेक्शन कुठून आले, कोणाचा ‘सप्लाय चैन’ यामागे सक्रीय आहे का, परभणीतील इतर जिममध्येही अशी विक्री होत होती का?, या व्यवसायात आणखी कोणी सहभागी आहेत का? या सर्व बाबीचा तपास पोलिस करत असून आरोपीचीही कसून चौकशी केली जात आहे.