पूर्णा : शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारात ऊसाला पाणी देत असताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गणेश देविदासराव कदम (७२) गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ एप्रिल रोजी घडली.
पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारात येथील तात्यासाहेब नगर येथील रहिवासी गणेश कदम ऊर्फ जी. डी. मामा यांची गट नंबर ८४ मध्ये शेतजमीन आहे. शनिवारी दुपारी कदम हे आपल्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अचानक रानडुकराने जोरदार हल्ला चढवला. त्यामध्ये शेतकरी कदम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
पायाचे हाड देखील मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतक-यांनी व नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने रानडुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतक-याकडून होत आहे.