मुंबई : अख्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडात नऊ वर्षानंतर न्यायालयाने आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह दोघांना दोषी ठरवले. पण या प्रकरणातील राजू पाटील या अरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुख्य कुरुंदकर यानेच आपल्या साथीदारांसह अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याला दोषी ठरवले.
अश्विनी बिंद्रे यांचे कळंबोली येथून २०१५ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याबाबत स्थापन केलेल्या एसआयटीने ८० जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर खूनाचा ठपका ठेवला होता. तपास अधिकारी निलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात कुरंदकर यांनी अश्विनी बिंद्रे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार कुरुंदकर यांच्यासह राजू उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पडळकर या चौघांची रवानगी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठे करण्यात आली होती. आता या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याच्यासह दोघांना दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणात ११ एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी मुंबईत खून झाला. याप्रकरणी शनिवारी सुनावणी झाली. आता या प्रकरणाला ११ तारखेला नऊ वर्ष होत असल्यानेच ११ एप्रिल २०२५ रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. दिवंगत अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी यांनी नववर्ष केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पण न्यायालय या प्रकरणात कोणती शिक्षा सुनावणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. पती राजू गोरे यांनी तपासादरम्यान दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल जात असत. तसेच या प्रकरणात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार करत लक्ष वेधण्याचे काम केलं होतं.
हातकलंगले तालुक्यातील आळते येथील अश्विनी बिद्रे या पोलीस दलातील एक धाडसी महिला अधिकारी म्हणून ओळखला जात होत्या. नोकरीला लागण्याच्या आधी त्यांचा हातकणंगले येथील महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे कार्यकर्ते असणा-या राजू गोरे यांच्याशी २००५ मध्ये विवाह झाला होता. विविहाच्या एका वर्षातच त्यांना पीएसआयच्या स्पर्धा परीक्षेत यश आले होते. तर त्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या होत्या.
२००६ मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती. यानंतर सांगली आणि रत्नागिरीत देखील त्यांनी काम केलं होतं. तर त्या पोस्टींगवर मुंबईतील कळंबोली येथे दाखल झाल्या होत्या. येथूनच त्यांचे अपहरण झाले होते. जेथून हे प्रकरण उघडकीस आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची पहिली भेट सांगलीत झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्या मैत्रीचे रूपांतरनंतर प्रेमसंबंधात झाले होते. याच्यातूनच बिद्रे आणि त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. तर याच मुद्द्यासह लग्नाच्या तकाद्यावरून कुरुंदकर यांच्याशीही अश्विनी बिद्रेंचा वाद झाला होता. याच वादातून अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचेनंतर एसआयटी तपासात समोर आले होते.
कळंबोली येथून अश्विनी बिद्रे यांचे २०१५ मध्ये अपहरण झाले होते. यानंतर अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंतेत होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे कर्तव्यावर असणा-या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यांना काही माहिती न मिळाल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मिसींगची तक्रार दिली होती. तसेच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्याचे कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती.
या तपासणीतून अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाची माहिती समोर आली होती. यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.
नऊ वर्षांच्या संघर्षाला यश
या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांध यामुळे बिद्रे आणि गोरी कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. पण हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला पनवेल आणि मुंबई सुनावणीसाठी फे-या मारल्या. इतकंच नाही तर तत्कालिन मुख्यमंर्त्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दाद मागितली होती. त्यांच्या या संघर्षाला आता नऊ वर्षानंतर यश आले असून पनवेल न्याय दिलाय. न्यायालयाने आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांना दोषी ठरवले आहे. आता या प्रकरणात ११ एप्रिल रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
कुरुंदकर मूळचा कोल्हापूर
बडतर्फ पोलिस अधिकारी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तो आजरा तालुक्यातील असून त्याचे कोल्हापूर शहरातील सम्राट नगर परिसरात आलिशान बंगला आहे. तसेच गावाकडे शेत जमीन आणि मोठे घर देखील आहे.