पूर्णा : दुचाकीवरून गुटखा घेऊन जाणा-या घोरबांड नावाच्या इसमास स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलिसांच्या पथकाने दि. ५ रोजी संयुक्त कारवाई करीत दुचाकीसह पकडले.
पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील, पूर्णा पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंदनसिंह परिहार पो.हे.कॉ. सचिन भदरगे, पो.कॉ. हनुमान ढगे, बीट जमादार श्याम काळे, यांच्या पथकाने झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर सापळा रचला होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कातनेश्वर शिवारातून जाणा-या कॅनल रस्त्याने तालुक्यातील एरंडेश्वर येथील मारुती घोरबांड नामक गुटखा तस्करास हिरो होंडा स्प्लेंडर एम.एच.२२ ए.एफ. १३८४ दुचाकीवरून एका पिशवीमध्ये प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असताना रंगेहात पकडले.
त्याच्याकडून राजनिवास नामक ८८०० रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पूर्णा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास फौजदार श्रीनिवास पडलवार करत आहेत.